मूल्यशिक्षण
व्यक्तीच्या अंगी शिक्षणाच्या साह्याने मूल्य रुजवून त्या मूल्यांचा उपयोग त्या व्यक्तीकडून स्वत:साठी आणि राष्ट्रसेवेसाठी होणे म्हणजे मूल्यशिक्षण होय. मूल्यशिक्षण हे शिक्षणाचे मूळ स्रोत आहे. मूल्य या संकल्पनेला बरीच मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असून मानवी प्राण्यांच्या उत्क्रांत अवस्थेपासून मूल्यांची सुरुवात होते. आजही त्यात भरच पडत असल्यामुळे मूल्यांची संख्या वाढलेली आहे. मानवाचे जीवन सामाजिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा बहुविध क्षेत्रांशी निगडित असल्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रांमधून बहुविध मूल्ये आलेली आणि विकसित झालेली आहे. मूल्य या संकल्पनेचे उगमस्थान आर्थिक असले, तरी मूल्य संकल्पनेने आर्थिक क्षेत्राच्या सीमारेषा केव्हाच ओलांडून पार केलेल्या आहेत. ‘लोकशाही मूल्यांचे रक्षण; सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समतेचे संवर्धन; सर्व धर्मांच्या सांस्कृतिक परंपरेतून आलेल्या मंगलमूल्यांचा स्वीकार आणि प्रत्येक धर्मातील अनिष्ट गोष्टींना पायाभूत असणारी तात्त्वीक भूमिका विद्यार्थांना समजावून सांगणे; तसेच शिक्षणक्षेत्रात आणि समाजजीवनात या तत्त्वांच्या पालनासाठी त्यांना कटिबद्ध करणे म्हणजेच खरे मूल्यशिक्षण होय’.
मानवी मूल्यांचे बीजारोपण करणे हे शिक्षणाचे अंतिम व चिरकालीन ध्येय असले पाहिजे, असे काही विचारवंतांचे मत आहे. ही मूल्ये बालकांमध्ये रुजविली नाहीत, तर भविष्यात अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. विचारवंत मूल्यशिक्षणाला जास्त महत्त्व देतात. मूल्यशिक्षणाद्वारे सुदृढ समाज निर्माण होतो आणि त्यातच व्यक्तींचे हित दडलेले असते. शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या संदर्भात मूल्य म्हणजे स्वतःच्या असण्यानेच मातृत्व प्राप्त झालेले वांछित आदर्श व ध्येये आहेत. हे आदर्श वा ध्येये प्राप्त केल्यानंतर एखाद्या व्यक्तीत वा सर्वांत किंवा ज्याला आपण आपल्या स्वभावाचा अत्युच्च घटक समजतो अशा घटकाच्या सर्व भागांत पूर्णतेची खोलवर भावना जागृत होते.
वैयक्तिक व सामाजिक दृष्टीने मूल्यशिक्षण आवश्यक आहे. मूल्याधिष्ठित वर्तन हे व्यक्तीमत्त्वाचे प्रमुख अंग आहे. मूल्यांमुळे वर्तनाला विशिष्ट दिशा आणि तात्त्विक बैठक लाभते. मानसिक संघर्षाच्या वेळी कोणता निर्णय घ्यावा, याचे उत्तर मूल्यांमुळे मिळते. मूल्याधिष्ठित वर्तनामुळे व्यक्ती अंतिम दृष्ट्या समाधानी होते. मूल्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य निर्मिती होते. सहकार्य, प्रेम, ऋजुता या मूल्यांमुळे तणाव कमी होतो. विविधता असलेल्या देशात एकात्मतेची भावना निर्माण होण्यास मूल्यशिक्षणाची मदत होते.
मूल्ये : मूल्यांचे अनेक प्रकार असून त्यांमध्ये शैक्षणिक मूल्ये, बौद्धिक मूल्ये, नैतिक मूल्ये, व्यक्तिगत मूल्ये, स्वाभाविक मूल्ये, आध्यात्मिक मूल्ये, सामाजिक मूल्ये, आर्थिक मूल्ये, राजकीय मूल्ये, राष्ट्रीय किंवा घटनात्मक मूल्ये, व्यावसायिक मूल्ये, मनोरंजनात्मक मूल्ये, सौंदर्याधिष्ठित मूल्ये इत्यादी प्रकार आहेत. मूल्ये पुढील प्रमाणे सांगता येते ꞉
- मूल्य म्हणजे व्यक्तीने काय केले पाहिजे याचे उत्तर होय.
- परंपरेला धरून एखाद्याच्या शारीरिक किंवा मानसिक स्वास्थाला, समाजहिताला, समायोजनेला उपयुक्त ठरणारी मार्गदर्शक जीवनतत्त्वे म्हणजे मूल्य होय.
- पैशांपेक्षा श्रेष्ठ असे आदर्श विचार, तत्त्वे, आचरण आणि सद्गुण ज्यांत असतात त्यांना मूल्य असे म्हणतात.
- जे विचार, तत्त्वे आचरण आणि सद्गुण हजारो लोकांना प्रदीर्घ काळ मार्गदर्शन करतात, त्यांच्या जीवनाचा आधार बनवतात, राष्ट्रजीवनाला प्रेरणा देतात, त्यांना मूल्य असे म्हणतात.
आपल्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासातून आणि महापुरुषांच्या चरित्रात्मक अभ्यासातून आपल्याला असंख्य मूल्यांचा शोध घेता येतो. मूल्यशिक्षण आपल्याला व्यापक विचार करायला शिकविते आणि त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा देते. आपल्या मनाला शांती, समाधान, स्थिरता देण्यासाठीही मूल्यांचे चिंतन उपयुक्त ठरते. ही मूल्ये ज्यांच्या जीवनातून प्रगत झाली, त्यांच्या जीवन चरित्रांचा अभ्यास आपल्याला ध्येयाचा मार्ग शिकवितो. आपले मन, भावना विचार यांना वळण लावण्याचे कार्य घरात आई, वडिल, आजी, आजोबा आणि शाळेत शिक्षक करीत असतात. शाळेतील अध्ययन, अध्यापन, अनेक प्रकारचे वाचन यांतून आपण विचार करू लागतो. चांगले विचार करणे व त्यानुसार वागणे, त्यातून आपल्यासमोर ध्येय, आदर्श साकार होतात. अशा आचार-विचारांना आपण संस्कार म्हणतो. अशा शिक्षणाने व संस्कारांनी आपले व्यक्तिमत्त्व घडत असते.
उद्दिष्ट्ये : शालेय शिक्षण मिळविणे हा प्रत्येक नाकरिकाचा मूलभूत हक्क आहे. शिक्षणातून विवध मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी रुजले जाऊन त्यानुसार ते समाजामध्ये वावरत असतात. म्हणून शिक्षणातून पुढील उद्दिष्टांसह मूल्यशिक्षण देणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यांचा अर्थ समजण्यास साह्य करणे.
- राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, संवेदनशीलता इत्यादी शालेय शिक्षणातून येणाऱ्या मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर करणे.
- व्यक्तिगत, राष्ट्रहित व सामाजिक जीवनाची जबाबदारी पेलू शकणारे नागरिक निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण करणे.
- आपल्या परिसरात असलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशांची जपणूक करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणे.
- मूल्यांच्या संस्कारासाठी मूल्यांना पोषक असे उपक्रम शाळेमध्ये राबविणे.
- मूल्य अंगी बाणविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून काही उपक्रम व प्रकल्प करवून घेणे.
- मूल्यांच्या जोपासनेसाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणे.
- चरित्र्यनिर्मिती व संवर्धन करणे.
- व्यक्तिमत्त्वाचा संतुलित विकास करणे.
- सौंदर्यात्मक दृष्टीचा विकास करण्यास मदत करणे.
- नागरिक म्हणून कर्तव्याची जाणीव निर्माण करून देणे.
- पर्यावरणात्मक जागरुकता निर्माण करणे.
- विद्यार्थांकडून मूल्यांचे आचरण व्हावे अशी परिस्थिती व संधी उपलब्ध करून देणे.
- धर्म, भाषा, जात, लिंग यांवर आधारित संकुचित दृष्टिकोणाला तिलांजली देण्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती करणे.
- देशाच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे.
- विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून संवेदनशीलता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, सौजन्यशीलता, स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्मसहिष्णुता, सत्य, प्रेम, करुणा, शांती इत्यादी गुणांचा विकास करणे.
- आत्मोन्नतीच्या प्रयत्नात प्रगती करीत राहणे इत्यादी.
मूल्यांची लक्षणे ꞉
- मूल्य म्हणजे पसंती. ही पसंती एखादे तत्त्व, वस्तू वा अन्य बाबतींतही असू शकेल.
- मूल्य व्यक्तीगत वा वस्तूगत असू शकते.
- मूल्यांचा विकास व्यक्तीगत अनुभव वा अध्ययन वा अभिसंधानाने होतो.
- मूल्यांमुळे वर्तनाला दिशा मिळते.
- मूल्याधिष्ठित निर्णय वा वर्तन व्यक्तीच्या वा समाजाच्या अंतिम कल्याणाच्या दृष्टीने चांगले असते.
- मूल्यांचा संबंध मानवातील उच्च अंशाशी असतो.
- मूल्ये जीवनाच्या विविध अंगासाठी-अर्थव्यवस्था, राजनीती, धर्म, संस्कृती इत्यादी-निकष पुरवितात.
- मूल्याधिष्ठित वर्तन वांछनीय व नैतिक असते.
- मूल्यांचा संबंध नीतीमत्तेशी असतो.
- मूल्यांमुळे मनुष्याच्या वर्तनाला तात्त्विक आधार मिळतो.
स्वरूप ꞉
- व्यक्तीगत जीवनासाठी दर्जा आणि मार्गदर्शन.
- व्यक्तींचा अनुभव, त्याची इष्टता आणि विशिष्ट परिस्थितीचा प्रभाव मूल्यांवर पडतो.
- राष्ट्राच्या धोरणासाठी मार्गदर्शन देण्यासाठी मूल्ये.
- मूल्ये ही आपल्या जीवन प्रवासाचे सुकाणू आहे.
- मूल्ये स्थिर नसतात.
- मूल्यांचे संपादन अज्ञात अशा अनेक मार्गांनी होते.
- मूल्यांमध्ये ज्ञानात्मक, भाषात्मक परिमाणे आढळतात.
- विमर्षणात्मक चिंतनाच्या प्रक्रियेतून मूल्यांची बांधणी व पुनर्बांधणी घडून येते.
- व्यक्तिची इच्छा, आवड यांनुसार मूल्ये.
- व्यक्तिच्या मूल्यांचा विस्तार हा लहानात लहान इच्छा ते दूरगामी आदर्श.
- समाजाच्या विकासाच्या अवस्थेवर मूल्ये आधारलेली असतात.
- समाजाच्या धार्मिक विचारसरणीवर मूल्ये आधारलेली असतात.
- मूल्ये सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञ इत्यादींवर आधारलेली असतात.
अध्यात्मवादात नैतिक मूल्यांना महत्त्व असते. समाजामध्ये राहून चांगले जीवन जगायचे असेल, तर काही नीतिनियम पाळले पाहिजे. त्यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, बंधुभाव, कर्तव्यपालन इत्यादी गुण आणि मनुष्याच्या उत्कर्षासाठी नैतिक मूल्ये आवश्यक आहेत. अलीकडे समाजात व शिक्षणक्षेत्रातही नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेला आढळतो. त्यामुळे राज्य शासनाने शाळांमधून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसहिष्णुता, श्रमप्रतिष्ठा, स्त्री-पुरुष समानता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोण, सौजन्यशीलता आणि संवेदनशीलता ही दहा मूल्यशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, पालक, नेते इत्यादींनी करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment